Sunday, December 11, 2011

मृगजळ एकांकिका स्पर्धा

काल मी माझ्या शाळेतल्या मित्रांबरोबर मृगजळ एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पाहण्यास गेलो होतो. तिकीट काढण्यावरून झालेला गोंधळ माझ्या नेहमीच लक्षात राहील. त्या बद्दल इथे मी काही जास्त सांगणार नाही. अंतिम फेरीत पाच एकांकिका होत्या. त्यातली पाचवी एकांकिका - "HTTP 404 Page Not Found" - आम्ही आधीच सवाईच्या वेळी पहिली होती. चवथ्या एकांकिकेबद्दल आमच्या मनात बरेच कुतूहल निर्माण झाले, कारण त्या एकांकिकेचा नाव होतं - "बी. पी." :)
पहिल्या एकांकिकेचा नाव होतं, "थरारली वीट". एका लहान मुलीच्या पहिल्या आळंदीच्या वारीत तिला येणारे अनुभव, तिच्या आयुष्याला मिळणारी कलाटणी, तिच्या आईबद्दलचं तिला कळणारे सत्य याचे हृदयद्रावक वर्णन या एकांकिकेत होते. "गिरगाव व्हाया दादर" या एकांकिकेचा लेखक हृषीकेश कोळी यानेच हि एकांकिका लिहिली आहे. (सवाईच्या वेळच्या "एम डी करतंय सादर, गिरगाव व्हाया दादर" ह्या घोषणा माझ्या कायम स्मरणात राहतील)
दुसरी एकांकिका सदर केली होती जोशी-बेडेकर कॉलेजने - "अलगद". ही गोष्ट होती प्रेमात "तोंडावर" पडलेल्या एका तरुणीची. ह्या तरुणीला एक मुलगा भेटतो, जो तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो. तशी कथा काही नवीन वाटली नाही, पण दोघांचाही अभिनय छान वाटला.
तिसरी एकांकिका, माझ्या मते, सर्वात कंटाळवाणी होती. विषय नेहमीचाच, भ्रष्टाचाराचा. मग रामिलीला मैदान आल, आणि उपोषणही.
चवथी आणि आम्हा सर्व मित्रांना आवडलेली एकांकिका म्हणजे, "बी. पी.". "अ" वर्गातल्या मुलांना एक "ड" वर्गातला मुलगा, कसा "sex" बद्दल माहिती देतो, हे एका विनोदी ढंगात सदर केले होते. "अ" वर्गातल्या मुलांच "अज्ञान", ज्याप्रकारे दाखवले होते, मला माझ्या दहावीची आठवण झाली. "ड" वर्गातला "विशू"ने तर धमालच केली होती नाटकात. सवाईला ही एकांकिका परत बघायला नक्कीच मजा येईल (पुढच्या वेळी शिटी घेऊनच जावी असा विचार करत आहे ;))

No comments: